भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहोगाव देवी परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 32 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आबिद सत्तार शेख, रा. शास्त्री वॉर्ड, वरठी असे मृत तरुणाचे नाव आहे. आबिद शेख हा आपल्या दोन मित्रांसोबत मोहोगाव देवी परिसरातील नदीकाठी गेला होता. तिघांनी जेवण केल्यानंतर आबिद नदीत आंघोळीसाठी उतरला. मात्र, नदीकाठावर रेती उत्खननामुळे तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यात त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. आबिद बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अखेर नदीत शोध घेतल्यानंतर आबिद शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.