मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी 03-04 फेब्रुवारी 2025 च्या रात्री दुबईहून आलेल्या तीन प्रवासी आणि विमानतळावरील एका खाजगी कर्मचाऱ्याला रोखून 2.830 किलो वजनाचे, 2.21 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. दुबईहून आलेल्या प्रवाशांनी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये लपवलेले 24 कॅरेट सोन्याचे डस्ट (गोल्ड डस्ट) विमानतळाच्या डिपार्चर हॉलमधील एका दुकानात ठेवलेल्या ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये ठेवले. यानंतर त्या दुकानात काम करणाऱ्या एका खाजगी कर्मचाऱ्याने ती बॅग उचलली.अधिकाऱ्यांनी या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, या ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये 2.966 किलो कच्चे सोने असल्याचे आढळले. त्यातील निव्वळ सोन्याचे वजन 2.830 किलो होते, ज्याची अंदाजे किंमत 2.21 कोटी रुपये आहे.
हेही वाचा: आता शेतीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत या चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.