नाशिकमध्ये प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारची चिमुकल्याला धडक
Edited Image
Minor Boy Killed In Car Accident: नाशिकमधून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंग क्षेत्रात कारने धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी (5 फेब्रुवारी) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली.
पार्किंगमध्ये खेळत होता चिमुरडा -
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील व्यवसायाने चालक होते आणि ते काही ग्राहकांना त्यांच्या गाडीतून हॉटेलमध्ये घेऊन जात होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर, मुलगा त्याच्या वडिलांच्या गाडीतून उतरला आणि पार्किंग क्षेत्रात खेळू लागला. त्याचे वडील गाडी पार्क करण्यासाठी गेले असताना, दुसरा एक व्यक्ती त्याची गाडी काढत होता, ज्याने मुलाला धडक दिली. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.
हेही वाचा - कराड-मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं तरुणावर हल्ला; आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेस्ट्स
कारने धडक दिल्याने मुलाला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला रुग्णालयात नेले, जेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं पडलं महागात! ट्रेनने धडक दिल्याने ठाण्यात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबईत भरधाव कारने चिरडल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू -
दरम्यान, डिसेंबर महिन्यात मुंबईतील वडाळा परिसरात आंबेडकर कॉलेजजवळ 19 वर्षीय तरुणाने भरधाव कारने धडक दिल्याने एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. आयुष लक्ष्मण किनवडे असं या अपघातात मृत झालेल्या मुलाचं नाव होतं. तो त्याच्या कुटुंबासह फुटपाथवर राहत होता. त्याचे वडील मजूर म्हणून काम करत होते. भूषण संदीप गोळे असं कारचालकाचं नाव आहे. आरोपीने आपल्या कारने मुलाला धडक दिली होती.