नाशिक: छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलंय. राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे पत्र?
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे.शिवभोजन थाळी उपक्रमामुळे भुकेलेल्यांना वेळेवर दोन घास मिळतात ही समाधानाची बाब आहे. शिवभोजनच्या दररोज 2 लक्ष थाळीसाठी वार्षिक 267 कोटी खर्च येतो आहे. शासनाच्या दृष्टीने भुकेलेल्यांच्या पोटासाठी २६७ कोटी हा खर्च तसा नगण्य आहे. त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
काय आहे शिवभोजन थाळी योजना?
शिवभोजन थाळी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत, गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन ॲप्लिकेशनचा वापर केला जातो.
हेही वाचा : आता 90 तास कार्यालयीन आठवडा?
शिवभोजन थाळी योजनेची वैशिष्ट्ये:
या योजनेअंतर्गत, गरीब आणि कष्टकऱ्यांना दहा रुपयांत जेवण दिले जाते.
या योजनेत दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक मूद भात असतो.
या योजनेमुळे गरीब आणि कष्टकऱ्यांची भूक भागते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन ॲप्लिकेशनचा वापर करावा लागतो.
शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यासाठी महिला बचत गटांचा प्राधान्याने विचार केला जातो.