छत्रपती संभाजीनगर : वन्यजीव विभागाकडील दर दहा वर्षांसाठी व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यात येतो. २०१४ ते २०१५ ते २०२४-२५ दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यातील बाब क्रमांक ३ व ६ नुसार गौताळा औट्रम अभयारण्यात पर्यटकांच्या प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद करण्यात आली असल्याने त्याच तरतुदीची अंमलबजावणी म्हणून गौताळा अभयारण्यात पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की, गौताळा अभयारण्यातील व वनपरिक्षेत्राच्या असलेले निसर्गरम्य स्थळे, खोलखोल दरी, उंच-उंच असणारी सातमाळा पर्वत रांगा, मोठमोठी हिरवीगार दाट झाडी, उंचावरून कोसळणारे धबधबे, खळखळणारे नदी-नाले बघण्यासाठी पर्यटकांची पाऊले गौताळा अभयारण्याकडे वळतात. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. खबरदारी म्हणून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिने पर्यटकांना प्रवेशास बंदी राहील.