Gold and Silver Demand Declines During Pitru Paksha: सराफा बाजारात सध्या खरेदीचा उत्साह मंदावला असून ग्राहकांनी दुकानांपासून काहीशी पाठ फिरवल्याचे दिसते. धर्मशास्त्रातील परंपरेनुसार पितृपंधरवड्यात नवीन वस्तू, दागिने अथवा मालमत्तेची खरेदी टाळली जाते. याच कारणास्तव गेल्या 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. मात्र, आगामी सण-उत्सवांमुळे बाजाराला पुन्हा एकदा झळाळी मिळेल अशी खात्री व्यापाऱ्यांना वाटत आहे.
अनंत चतुर्दशीनंतर दरात घसरण
गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे 14 सप्टेंबरच्या सुमारास सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,000 रुपये (विना जीएसटी) आणि चांदीचा दर प्रति किलो 2,03,000 रुपये होता. त्यानंतर 18 सप्टेंबरपर्यंत दरवाढ होऊन सोने 1,52,500 रुपयांवर, तर चांदी 2,41,000 रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. परंतु, अनंत चतुर्दशीच्या (25 सप्टेंबर) दिवशी या दरांमध्ये मोठी घसरण झाली, ज्यामध्ये सोने 1,50,000 रुपयांवर तर चांदी 2,32,000 रुपयांवर खाली आली.
हेही वाचा – महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांना बघावी लागणार वाट, श्री औंढा नागनाथ मंदिरात एक महिना दर्शन बंद; जाणून घ्या कालावधी आणि नेमकं कारण
स्थानिक बाजारात चढ-उतार
पितृपक्षाची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी झाल्यानंतर बाजारात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. 29 सप्टेंबर रोजी पुन्हा काही प्रमाणात सुधारणा होत सोन्याचा दर 1,51,000 रुपये आणि चांदी 2,35,000 रुपये नोंदवली गेली. यानंतर पुन्हा घसरण होऊन सोने 1,47,300 रुपयांपर्यंत खाली आले होते. सध्याच्या स्थिर स्थितीनुसार सोने प्रति 10 ग्रॅम 1,49,000 रुपये तर चांदी प्रति किलो 2,26,000 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
दसरा-दिवाळी, लग्नसराईत तेजीची अपेक्षा
सराफा बाजारातील विश्लेषक आणि व्यापाऱ्यांच्या मते, चालू आठवडाभर मंदीचे हेच चित्र कायम राहण्याचा अंदाज आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून बाजारातील मागणी वाढण्यास सुरुवात होईल आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला (दसरा) मोठी उलाढाल अपेक्षित आहे. दसऱ्यानंतर येणारी दिवाळी आणि त्यानंतरचा लग्नसराईचा हंगाम यामुळे सुवर्णबाजारात पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येईल.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला, ‘या’ 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
दीर्घकालीन अंदाजाचा विचार करता, येत्या काळात सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम मागे 10,000 ते 15,000 रुपयांची वाढ होऊ शकते, ज्यामुळे दर 2,00,000 रुपयांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही प्रति किलो 25,000 ते 30,000 रुपयांची मोठी वाढ होऊन ती 3,00,000 ते 3,50,000 रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.