केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; आता 63 टक्के मिळणार DA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; आता 63 टक्के मिळणार DA
Central government employees DA hike

ऐन सणासुदीच्या दिवसांत केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 60 टक्क्यांवरून थेट 63 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई सवलतीतही 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या दिवाळी भेटामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा सण आणखी आनंदात साजरा होणार आहे.

1 जुलै 2026 पासून निर्णय लागू

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे हे वाढीव दर 1 जुलै 2026 पासून लागू मानले जातील. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचे थकीत पैसे आगामी पगारासोबत दिले जातील. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या मान्य नियमांनुसारच ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चालू महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.

हेही वाचा –  सोन्याच्या भावात पुन्हा वाढ! मुंबईसह तुमच्या शहरात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

यापूर्वी एप्रिल 2026 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये झाली होती वाढ

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नियमित अंतराने सुधारणा केली जाते. याआधी याच वर्षी एप्रिल 2026 मध्ये सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ केली होती, ज्यामुळे हा भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के झाला होता. त्यापूर्वी, ऑक्टोबर 2025 मध्ये महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत प्रत्येकी 3 टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली होती. आता ताज्या 3 टक्क्यांच्या वाढीनंतर महागाई भत्ता 63 टक्के झाल्याने महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version