मुंबईच्या मालाडमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. नशेच्या ओव्हरडोसमुळे एका तरुणाचा तडफडून मृत्यू झाला आहे. मुंबई मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहणाऱ्या अमन सोनीला त्याच्या मित्रांनी जबरदस्तीने घेऊन जाऊन ड्रग्सचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांनी दावा केला आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे सोनी कुटुंबाने आपला 20 वर्षांचा मुलगा जीवानिशी गमावला.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मित्रांनी अमनला घरातून बोलावून अप्पापाडा येथील BMC गार्डनमध्ये नेले. त्यानंतर गार्डनमध्ये अमनला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन दिले. ड्रग्जच्या डबल डोसमुळे अमानची प्रकृती अचानक खालावली आणि तो अत्यवस्थ झाला. ज्यामुळे काही वेळातच अमनचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेले इतर युवकही नशेच्या अवस्थेत बेसुध असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेशी संबंधित कथित व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये ड्रग्सचे इंजेक्शन घेतल्याचे आले. इतकचं नव्हे अमन नशेच्या अवस्थेत तडफडताना देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला.
मुंबईकडे जाणारी ST बस मध्येच थांबली अन् प्रवाशांचा उडाला थरकाप; चाकणमध्ये काय घडलं?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याला तातडीने गीतांजली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याला मावळी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी या गंभीर प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता पोलिसांच्या हाती घटनास्थळावर नशेशी संबंधित साहित्य आणि रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. तसेच अप्पापाडा BMC गार्डनमध्ये फॉरेन्सिक पथकाकडून तपास देखील सुरु आहे.
दरम्यान या घटनेसंबंधीत पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या मृत तरुण अमान सोनी याचा मृतदेह शताब्दी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे अमनचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झाला की अन्य कारणाने, हे पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होईल. तसेच अमनला नेमके कोणते ड्रग्ज देण्यात आले आणि इंजेक्शन कोणी दिले, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचसोबत गार्डनमध्ये ड्रग्जचा वापर यापूर्वीही होत होता का, याचाही पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच या प्रकारामुळे मुंबईचा उडता पंजाब झालाय का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.