Thane Train Accident Case: मुंबईतील ठाणे-मुंब्रा रेल्वे अपघाताच्या पाच महिन्यांनंतर अखेर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 9 जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि नऊ जण जखमी झाले होते. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस आणि वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण विशेष ठरत आहे, कारण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध जीआरपीने गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या प्रकरणी अभियंत्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 125(अ) आणि 125(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कलमे इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृतीं आणि गुन्हेगारी निष्काळजीपणाशी संबंधित आहेत. अधिक तपशील पोलिसांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
हेही वाचा - Chembur School Mehndi Controversy : शाळेत मेहंदीवरून वाद! विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त
प्राप्त माहितीनुसार, अपघाताच्या काही दिवस आधीच ट्रॅक क्रमांक 4 वर चुकीची दुरुस्ती करण्यात आली होती. योग्य वेल्डिंग न करता ट्रॅक बदलण्यात आल्याने रुळ असमान झाले. यामुळे गाड्यांचे संतुलन बिघडले आणि ट्रेन एकमेकांच्या मार्गात आली. तांत्रिक तपासणीत समोर आले की, आवश्यक 4506 मिमी अंतराऐवजी रुळांमधील अंतर फक्त 4265 मिमी ठेवण्यात आले होते, जे सुरक्षा मानकांपेक्षा कमी होते.
हेही वाचा - Mumbai Metro : मेट्रोचा प्रवास होणार अधिक सुखकर, प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
याशिवाय, अपघाताच्या काही दिवस आधी मे-जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचले. तरीही अभियंत्यांनी दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या विनंत्या दुर्लक्षित केल्या. ही दुर्घटना दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एका वळणावर घडली. एका गाडीचा रुळांवरचा तोल गेला आणि ती शेजारील ट्रॅककडे वळली, ज्यामुळे भीषण अपघात घडला.
पुढील तपास सुरू
सध्या जीआरपीने दोन्ही अभियंत्यांचे जबाब नोंदवली आहेत. याशिवाय, ट्रॅक दुरुस्तीतील दोष आणि तांत्रिक निष्काळजीपणा या दोन्ही गोष्टींचा सखोल तपास सुरू आहे.