Tushar Apte Resignation: बदलापूर येथील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून झालेली नियुक्ती अखेर वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि त्यांना 24 तासांच्या आत राजीनामा द्यावा लागला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भाजपने राजकीय पद बहाल केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती, ज्याचा परिणाम म्हणून पक्षाला आपली नामुष्की टाळण्यासाठी हा 'यू-टर्न' घ्यावा लागला.
नेमका वाद काय होता?
ज्या शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले, त्या शाळेचा सचिव असलेला तुषार आपटे या प्रकरणात सहआरोपी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता आणि नंतर कायदेशीर प्रक्रियेतून त्याला जामीन मिळाला होता. खटला अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपने त्याला सन्मानाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले. या निर्णयामुळे भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
हेही वाचा – Gunratna Sadavarte: ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल; पत्रकार परिषदेत एकामागून एक गंभीर आरोप
पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने माघार
अकोटमध्ये एमआयएमसोबतची जवळीक आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसशी केलेले साटेलोटे, अशा घटनांमुळे भाजप आधीच बॅकफूटवर होती. त्यातच आपटे यांच्या नियुक्तीमुळे भाजपने 'विकृतीला स्वीकृती' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. हा वाद थेट देशपातळीवर पोहोचण्याची चिन्हे दिसताच, वरिष्ठांच्या आदेशानुसार तुषार आपटेचा राजीनामा घेण्यात आला.
राजीनामा दिल्यानंतर तुषार आपटेने आपली बाजू मांडताना म्हटले की, 'माझ्या नियुक्तीमुळे शाळेवर आणि भारतीय जनता पक्षावर नाहक टीका होत आहे. संस्थेची आणि पक्षाची बदनामी होऊ नये, या हेतूने मी स्वखुशीने हे पद सोडत आहे.' बदलापूरच्या स्थानिक प्रभागातील 4 भाजप उमेदवारांना निवडून आणण्यात आपटेची भूमिका महत्त्वाची होती. याच 'कामाची पावती' म्हणून पक्षाने त्यांना हे पद दिले होते. मात्र, जनतेचा वाढता रोष आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्षाने त्यांना तात्काळ बाजूला करणेच योग्य समजले.