मध्य रेल्वेवर 7 ऑक्टोबरपासून तब्बल 12 दिवसांचा मेगाब्लॉक; कसारा मार्गावरील लोकल अन् एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे (3rd Line) महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 12 दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे.
मध्य रेल्वेवर 7 ऑक्टोबरपासून तब्बल 12 दिवसांचा मेगाब्लॉक; कसारा मार्गावरील लोकल अन् एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम
कसारा मार्गावरील लोकल सेवा कोलमडणार

Asangaon Kasara Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे (3rd Line) महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 12 दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे पहिल्या टप्प्यात, म्हणजेच 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कसारा मार्गावरील स्थानिक लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहे. उंबरमाळी, खर्डी आणि कसारा दरम्यान उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्यांवर मर्यादा येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि स्थानिक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

अनेक कसारा लोकल रद्द; आसनगाव स्टेशन बनणार तात्पुरते टर्मिनस

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.35 ते रात्री 8.35 वाजेपर्यंत, तर 8 आणि 9 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकांवर ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत सीएसएमटी (CSMT), टिटवाळा आणि कसारा दरम्यान धावणाऱ्या 4 महत्त्वाच्या लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुपारी सुटणाऱ्या 4 लोकल कसाराऐवजी आसनगाव स्थानकापर्यंतच चालवल्या जातील आणि तेथूनच माघारी सोडल्या जातील. त्यामुळे कसारा परिसरातील प्रवाशांना आसनगावपर्यंत जाण्यासाठी रस्ते वाहतुकीसारख्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. ब्लॉकच्या काळात सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी दुपारी 12.30 वाजता शेवटची लोकल सुटेल.

हेही वाचा – ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत मोठा निर्णय! भायखळ्याचा मार्ग बदलला, आता कुठून निघणार मोर्चा?

प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार

उपनगरीय लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि सीएसएमटीवरून बनारस, पाटलीपुत्र, अमृतसर आणि गोरखपूरकडे जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही एक्स्प्रेस गाड्या इगतपुरी, खर्डी आणि आटगाव स्थानकांवर थांबवून चालवल्या जातील. यामुळे इतरही काही मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version