मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी सुरू असतानाच आता त्याच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी प्रस्तावित असलेला भायखळा ते आझाद मैदान हा मार्ग बदलून आता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा करण्यात आला आहे. त्यामुळे मोर्चाचे अंतरही काही प्रमाणात कमी होणार आहे.
भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमापासून सुरुवात
राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून या संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला भायखळा परिसरातून मोर्चा काढण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता त्यात बदल करून मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा नवा मार्ग असेल.
4 ऑक्टोबरला सकाळपासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होणार असून, सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मोर्चासाठी राज्यातील विविध भागांतून शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेसमोर सभेचे आयोजन
मोर्चा पुढे सरकत मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर होणार असल्याची माहिती आहे. यासाठी महापालिकेसमोर व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.