Mumbai Local Passenger Protest Against Central Railway: छटपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतातील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल 418 विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, परराज्यातील प्रवाशांसाठी तातडीने विशेष गाड्यांची सोय करणाऱ्या रेल्वेने मुंबईतील कसारा आणि कर्जत मार्गावरील 10 लाखांहून अधिक नियमित लोकल प्रवाशांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. या दुटप्पी धोरणावर मुंबईतील नियमित नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवासी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे.
इंजिन आणि डबे परराज्यांसाठी उपलब्ध, मग लोकलसाठी का नाही? प्रवासी संघटनेचा सवाल
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून रेल्वेच्या या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. छटपूजेसाठी विशेष गाड्या सोडण्याला विरोध नसला, तरी 418 गाड्यांसाठी इंजिन, डबे, रेल्वे कर्मचारी आणि मार्ग उपलब्ध असणाऱ्या प्रशासनाला मुंबईकरांसाठी 10 ते 12 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करायला मानसिकता का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार थेट स्थानिक प्रवाशांवर अन्याय करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील 16 वर्षांत कसारा-कर्जत मार्गावर एकही नवीन लोकल नाही
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2010 सालापासून म्हणजेच मागील 16 वर्षांत कसारा आणि कर्जत या उपनगरीय मार्गावर एकही नवीन लोकल फेरी वाढवण्यात आलेली नाही. याउलट, याच काळात विशेष ट्रेनच्या नावाखाली 100 हून अधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. कसारा आणि कर्जत दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी सध्या उपलब्ध मार्गांवरच तात्काळ वाढीव फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
1 नोव्हेंबरची मुदत; 1 डिसेंबरपासून तीव्र सनदशीर आंदोलनाचा इशारा
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता, सकाळी कसारा ते सीएसएमटी आणि संध्याकाळी सीएसएमटी ते कसारा-कर्जतदरम्यान किमान 12 नवीन लोकल गाड्या सुरू कराव्यात, अशी ठाम मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. रेल्वे प्रशासनाला 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत निर्णय न झाल्यास 1 डिसेंबरपासून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा, मेसेज चेक केला का?