मुंबई-ठाणे प्रवास अधिक सुसाट; 50 मिनिटांचा टप्पा 25 मिनिटांवर, MMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात सुमारे 90 टन वजनाचा पहिला प्रीकास्ट ब्लॉक आधुनिक 'लाँचिंग गॅन्ट्री' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वीपणे बसवण्यात आला आहे.
मुंबई-ठाणे प्रवास अधिक सुसाट; 50 मिनिटांचा टप्पा 25 मिनिटांवर, MMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eastern Freeway Extension: मुंबई आणि ठाणे शहरा दरम्यान दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून लाखो वाहनचालकांना कायमचा दिलासा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) कंबर कसली आहे. छेडा नगर ते आनंद नगर या 13.9 किलोमीटर लांबीच्या ‘ईस्टर्न फ्रीवे एक्सटेंशन’ या 6-पदरी उन्नत मार्गाच्या बांधकामातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात सुमारे 90 टन वजनाचा पहिला प्रीकास्ट ब्लॉक आधुनिक ‘लाँचिंग गॅन्ट्री’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वीपणे बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहनांची वाहतूक सलग सुरू असताना, कोणत्याही अडथळ्याविना हवेत हे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले.

2,682 कोटींचा भव्य प्रकल्प; घाटकोपर ते ठाणे जोडणारा महत्त्वाचा मार्ग

सुमारे 2,682 कोटी कंत्राट खर्च असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात आहे. संपूर्ण उन्नत मार्गाची उभारणी करण्यासाठी 40 मीटर लांबीचे एकूण 288 स्पॅन तयार केले जाणार आहेत, ज्यासाठी तब्बल 3,732 प्रीकास्ट सेगमेंटचा वापर होणार आहे. या उन्नत मार्गावर घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जेव्हीएलआर (JVLR), ऐरोली आणि मुलूंड या प्रमुख उपनगरांना जोडण्यासाठी खास रॅम्प आणि लूप तयार केले जाणार आहेत. यामुळे पूर्व उपनगरांतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था देखील या पुलाशी जोडली जाणार आहे.

हेही वाचा – मुंबईतील ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चादरम्यान संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका; नेमके काय म्हणाले?

प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी वाचणार; लाखो प्रवाशांना होणार मोठा फायदा

सध्याच्या घडीला दक्षिण मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाताना किंवा ठाण्यातून शहरात येताना घाटकोपर, कांजूरमार्ग आणि मुलुंड पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हा उन्नत मार्ग पूर्णत्वास आल्यानंतर दक्षिण मुंबई ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ थेट 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकर अन् ठाणेकरांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार असून, पूर्व उपनगरांतील वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version