मुंबई : "सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी लावून देतो अशी बतावणी करून सुमारे दोन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांना यश आले आहे. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पीडित व्यक्तीने आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपी रिंकू शर्मा याने आपण आयकर आयुक्त असल्याचे भासवून, त्यांच्या मुलाला नोकरी लावतो असे सांगून दहा लाखांची फसवणूक केली होती.
या तक्रारीवरून मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या विरार युनिट तीनने सापळा रचून बनावट आयुक्ताला तळोजा येथून अटक केली. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ४० लोकांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयकर विभागात ड्रायव्हरची नोकरी करणारा रिंकू शर्मा, जो फक्त सहावी शिकलेला होता, त्याने आयकर आयुक्त (आय.आर.एस.) अधिकारी असल्याचे भासवून आयकर विभागाच्या वाहनाचा उपयोग करून, पीडितांच्या मुलांना आयकर निरीक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्याने फसवणुकीतून फिर्यादीकडून वेळोवेळी ५ लाख रुपये घेतले. अखेर, फसवणूक करणाऱ्या मुलीस आयकर निरीक्षक म्हणून बनावट ओळखपत्र व नियुक्ती पत्र देऊन त्याला नोकरी न देता फसवणूक केली.
👉👉 हे देखील वाचा : चक्क वाघासोबत सेल्फी पाहा कुठे घडला हा प्रकार
पोलिस तपासानुसार, रिंकू शर्मा ने आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त आणि आयकर निरीक्षक अशा बनावट ओळखपत्रांचा वापर करून सुमारे ४० बेरोजगार तरुण-तरुणींना फसवले आणि त्यांच्याकडून दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम उकलली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उप आयुक्त गुन्हे, व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे, आरोपीला तळोजा येथून ७ जानेवारी २०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि सीबीआय पोलीस आयुक्त अशा २८ बनावट ओळखपत्रांचा साठा मिळाला.
गुन्हे शाखेच्या तपासानुसार रिंकू शर्मा हा बीकेसी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात ठेका पद्धतीवर वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याने आपल्या राहणीमानातून आयपीएस अधिकारी किंवा आयकर आयुक्त असावा असा भास निर्माण केला होता. त्याने महागड्या गाड्या वापरून आणि आयकर विभागाच्या लोगो असलेली गाडी वापरून लोकांना गंडा घातला. पोलिसांनी यावरून अंदाज व्यक्त केला आहे की, या फसवणुकीत आणखी काही लोकांचा समावेश असू शकतो.
👉👉 हे देखील वाचा : 'विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे दहा उमेदवार पडले' कोणी केला आरोप ?
अर्थात, या घटनेवर पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ आणि गुन्हे शाखेच्या प्रमुख प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. पोलिसांनी २८ विविध बनावट ओळखपत्र जप्त केले आहेत. या तपासात पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. संपूर्ण तपास व कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे, अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.