Saturday, February 14, 2026 04:03:21 AM

Belasis Bridge: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! चार महिने आधीच पूर्ण झाला बेलासिस पूल; पालिकेचा नवा रेकॉर्ड

ब्रिटीशकालीन जुना पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारण्याचे आव्हान पालिकेने निविदेतील मुदतीपेक्षा तब्बल 4 महिने आधीच फत्ते केले आहे.

belasis bridge मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी चार महिने आधीच पूर्ण झाला बेलासिस पूल पालिकेचा नवा रेकॉर्ड

Belasis Bridge: दक्षिण मुंबईतील दळणवळणाचा कणा मानला जाणारा 'बेलासिस उड्डाणपूल' महापालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. ब्रिटीशकालीन जुना पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारण्याचे आव्हान पालिकेने निविदेतील मुदतीपेक्षा तब्बल 4 महिने आधीच फत्ते केले आहे. 15 महिने आणि 6 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग आता वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, लवकरच याचे लोकार्पण होणार आहे.

15 महिन्यांत काम फत्ते
1 ऑक्टोबर 2024 रोजी या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्या थेट देखरेखीखाली हे काम युद्धपातळीवर चालले. वास्तविक पाहता या कामासाठी अजून 4 महिन्यांचा अवधी शिल्लक होता, मात्र सूक्ष्म नियोजन आणि पावसाळ्यातही काम सुरू ठेवल्यामुळे हा पूल जानेवारी 2026 मध्येच पूर्ण झाला आहे.

आव्हानांची 'एक्स्प्रेस' पार केली
हा प्रकल्प पूर्ण करणे पालिकेसाठी सोपे नव्हते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अभियंत्यांनी हे यश मिळवले. पुलाच्या मार्गातील 13 बांधकामे हटवून त्यांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. तसेच बेस्टच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतर आणि उच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई जिंकून कामाचा मार्ग मोकळा करण्यात आला. पावसाचे 4 महिने वाया जाऊ न देता कामाचा वेग कायम राखला.

हेही वाचा -Septic Tank Rules : 'या बिल्डरांना थेट...'; उच्च न्यायालयाकडून बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश

कुठे जोडला जाणार हा पूल?
दरम्यान, 333 मीटर लांबीचा हा पूल ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. रेल्वे हद्दीतून जाणारा 36.90 मीटरचा भाग आणि 7 मीटर रुंदीच्या दोन्ही बाजूंच्या मार्गिकांमुळे या भागातील वाहतूक अधिक वेगवान होईल. या पुलामुळे महालक्ष्मी स्थानक परिसर, दादासाहेब भडकमकर मार्ग आणि पठ्ठे बापूराव मार्गावरील वाहतूक कोंडी आता इतिहासजमा होणार आहे.

लोकार्पण कधी?
पुलाची रचना आणि मजबूतीची चाचणी (Load Test) 6 जानेवारी 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली आहे. आता केवळ रेल्वे विभागाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' (NOC) मिळणे बाकी आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने हा पूल सर्वसामान्यांसाठी तातडीने खुला केला जाईल.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या