मुंबईतील कुर्ला परिसरात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त स्थापन केलेल्या मंडपाच्या दिशेने अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी तिघांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून, धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 13 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील गौरी शंकर चौक परिसरात मध्यरात्री 12.40 वाजण्याच्या सुमारास मंडपाबाहेर जागरण सुरू असताना, हंस रेसिडेन्सी इमारतीतून आलेल्या तरुणाने अंडे फेकल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित तरुणाला जाब विचारल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वाद झाल्याची देखील माहिती आहे. अन्य दोन तरुणांनीही आरडाओरड करत असल्याचे तक्रारीत नमूद झाले. यादरम्यान झैद इकबाल मेहतर (वय 21), अब्दुल रहमान फारुख गोलंदाज (वय 18) आणि अझफाक करीम खान (वय 19) यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांत FIR दाखल करण्यात आली असून तिघांविरोधात तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळात विविध ठिकाणी देवीची स्थापना करून मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जात असताना, अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात नेमकी कोणती परिस्थिती होती आणि संबंधित व्यक्तींनी हा प्रकार का केला, याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची अपेक्षा आहे. परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.
हेही वाचा- अमित शाह यांच्या मतदारसंघातील निवडणुकीचे धक्कादायक निकाल; मतांच्या विभाजनामुळे…
मुंबईत गणरायाच्या आगमनात अंडी फेकल्याच संतापजनक प्रकार
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माझगाव परिसरात बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान एका इमारतीमधून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दक्षिण मुंबईतील माझगाव येथे गणेश मूर्तीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याच्या आरोपावरून एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.
एका गृहनिर्माण संस्थेबाहेर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तो संतापला होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले की, दानिश शेर खान असे नाव असलेल्या या आरोपीचे अंड्यांच्या वितरणाचे (डिलिव्हरीचे) ऑनलाइन काम होते. घटनेच्या दिवशी, डिलिव्हरी करणारा खान माझगावमधील ‘कॉन्टिनेंटल हाइट्स’ इमारतीत एका ऑर्डरची डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. मात्र, सोसायटीबाहेर फोडण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे त्याच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली आणि त्याला नीट चालणेही कठीण झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने गणेश मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज