मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शासकीय महाविद्यालयातील कामकाजाची पोलखोल केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या शासकीय दंत महाविद्यालयातील सभागृहात पाणी साचल्याचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या सभागृहासाठी तब्बल 8-9 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अद्याप या सभागृहाचे उद्घाटनदेखील झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तरी मुंबईच्या मुसळधार पावसात जागोजागी पाणी साचल्याचे चित्र दिसत असतानाच आता महाविद्यालयाच्या सभागृहातही पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदार सुनील प्रभू यांनी शासकीय दंत महाविद्यालयाच्या नवीन तळघरातील सभागृहात पावसाचे पाणी शिरल्याने 8-9 कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, येथील पाणी उपसण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
या सभागृहाच्या बांधकामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र दोनच दिवसांच्या पावसाने कोटी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले, असे त्यांचे म्हणणे आहे. या सभागृहाचे गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसाच्या पावसातच तळघरातील मार्ग, कॅन्टीन आणि हॉलमध्ये सुद्धा पाणीच पाणी साचल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बांधकामासाठी अंदाजे 8-9 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून हे सभागृह सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बांधले आहे. ते अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले नसल्याचेही समजते.