MNS Support Eknath Shinde Shivsena in KDMC : राज्याच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपावर सडकून टीका करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता अनपेक्षितपणे शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीदरम्यान मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी मुंबई गुजरातींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र, निकालानंतर चित्र पालटले असून स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात खुद्द राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी, मनसेच्या या पावलामुळे खळबळ उडाली आहे.
स्थानिक पातळीवरील निर्णय? राज ठाकरे याच्याशी सहमत नाहीत?
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या युतीवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. 21 जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, कल्याण-डोंबिवलीतील या निर्णयामुळे राज ठाकरे स्वतः व्यथित आहेत. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कारणांसाठी हा पाठिंबा दिला असून, ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे त्यांनी सूचित केले. संजय राऊत यांच्या मते, राज ठाकरे या स्थानिक घडामोडींशी अजिबात सहमत नाहीत आणि हा निर्णय त्यांच्या संमतीविना झाला आहे.
हेही वाचा - Raju Patil : " ... म्हणून आम्ही पाठिंबा दिला" ; राजू पाटलांनी सांगितली युतीची इनसाईड स्टोरी
बंडखोर नगरसेवकांवर कारवाईची मागणी
संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस पक्षाचे उदाहरण देत मनसे नेतृत्वाला अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. अंबरनाथमध्ये यापूर्वी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन भाजपाला पाठिंबा दिला होता, तेव्हा काँग्रेसने त्या सर्व 12 जणांना तात्काळ पक्षातून बाहेर काढले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. कल्याण-डोंबिवलीतही ज्यांनी पक्षाच्या मूळ विचारधारेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली आहे. स्थानिक स्तरावर झालेली ही तडजोड पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील राजकीय समीकरणे बदलणार
या नवीन युतीमुळे आगामी काळातील राजकारण कोणत्या दिशेला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढले होते, मात्र निकालानंतर अवघ्या एका आठवड्यातच मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 122 जागांच्या या महानगरपालिकेत बहुमतासाठी 62 हा आकडा गाठण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. मनसेच्या 5 आणि ठाकरे गटातून फुटलेल्या काही नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड झाले असून, आता राज ठाकरे यावर काय अंतिम भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : KDMC नंतर मुंबईतही ठाकरे गट फुटला, उद्धव ठाकरे गट नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल