मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर असताना भाजपप्रणीत महायुती सरकारच्या आमदारांशी बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
"पंतप्रधान मोदी १५ जानेवारीला मुंबईत येत आहेत आणि महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकांनी आम्हाला प्रचंड जनादेश दिला आहे, त्यामुळे आमच्यावरची जबाबदारीही वाढली आहे... आज आम्ही एक बैठक घेतली ज्यामध्ये पक्षाच्या संघटनेबद्दल व घेतलेल्या निर्णयांबद्दल चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही चर्चा झाली... पंतप्रधान मोदी यांनी आमच्या सरकारला सातत्याने पाठिंबा दिला आहे आणि याच कारणामुळे गेल्या दोन-सव्वा वर्षांत महायुतीचे सरकार चांगले काम करू शकले. म्हणूनच लोकांनी आम्हाला मोठा बहुमत दिला आहे," असे शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले.
पंतप्रधान मोदी आपल्या मुंबई दौऱ्यात १५ जानेवारीला नेव्हल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजांचे राष्ट्राला समर्पण करतील. यामध्ये आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा समावेश आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, या तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजांच्या राष्ट्र समर्पणाने भारताच्या संरक्षण उत्पादन आणि समुद्री सुरक्षेमधील जागतिक नेते होण्याच्या दृष्टिकोनाला मोठे यश मिळाले आहे.
आयएनएस निलगिरी : प्रकल्प १७ए स्टेल्थ फ्रिगेट अंतर्गत बांधण्यात आलेले पहिले जहाज आहे. हे भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केले आहे. या जहाजामध्ये अधिक टिकाऊपणा, समुद्री क्षमतांसाठी प्रगत असलेली वैशिष्ट्ये आणि स्टेल्थ वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यामुळे हे पुढच्या पिढीतील स्वदेशी फ्रिगेटचे प्रतिक बनले आहे.
आयएनएस सूरत : प्रकल्प १५बी अंतर्गत बांधण्यात आलेले चौथे आणि अंतिम गाईडेड मिसाईल डेस्ट्रॉयर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि प्रगत नाशकांमध्ये गणले जाते. ७५% स्वदेशी सामग्री असलेल्या या जहाजामध्ये अत्याधुनिक शस्त्र-संवेदक पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत.
👉👉 हे देखील वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते मिशन मौसमचे उद्घाटन
आयएनएस वाघशीर : प्रकल्प ७५ स्कॉर्पीन अंतर्गत बांधण्यात आलेली सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही पाणबुडी भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतीक आहे.
तसेच, पंतप्रधान मोदी खारघर, नवी मुंबई येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, इस्कॉन प्रकल्पाचे सुद्धा उद्घाटन करणार आहेत.
हा प्रकल्प ९ एकरांवर पसरलेला असून यात विविध देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालये आणि सभागृह, उपचार केंद्र यांचा समावेश आहे. वैदिक शिक्षणाच्या माध्यमातून सार्वभौम बंधुता, शांतता आणि समरसता प्रस्थापित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून देशविदेशातील भक्तगणं खारघर मध्ये येण्यास सुरुवात झालेत.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.