मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांची घोषणा जवळ आली असून शहरातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपनं आपल्या जाहीरनाम्यासाठी विशेष समिती जाहीर केली असून या समितीमार्फत नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक मुद्द्यांचा समावेश असलेला सविस्तर जाहीरनामा तयार केला जाणार आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या समितीची घोषणा केली आहे. एकूण 11 सदस्यीय या जाहीरनामा समितीत आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांच्यासह पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. या सर्व अभिप्रायांचा विचार करून आगामी मुंबई जाहीरनामा अंतिम केला जाणार आहे.
समितीमध्ये आमदार पराग अळवणी, प्रभाकर शिंदे, आमदार योगेश सागर, योजना ठोकळे, आमदार संजय उपाध्याय, भालचंद्र शिरसाट, प्रतिक कर्पे, अभिजीत सामंत, रीटा मकवाना आणि श्रीकला पिल्ले यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, आरोग्य-स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक यांसारख्या मुंबईकरांच्या थेट समस्यांवर उपाययोजना आखणे ही या समितीची प्राथमिक जबाबदारी असेल.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “वोट चोरीचा बनाव जनतेनं उधळून लावला. विरोधकांनी केलेले आरोप हा जनतेचा अपमान आहे. बिहारचा निकाल हा फक्त ट्रेलर असून खरा पिक्चर मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल.” तसेच एनडीएला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जोरदार समर्थन मिळेल, असा दावा त्यांनी केला.
राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे रणांगण तापले आहे. यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे. या निकालानंतर जिल्हा परिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी महायुतीत तणावाची स्थिती तर काही ठिकाणी एकत्र लढाई अशी दोन्ही चित्रं राजकारणात दिसत आहेत.
सध्या मुंबई महापालिका निवडणूक हे राज्यातील सर्वात महत्त्वाचे राजकीय रणांगण मानले जात असून सर्व प्रमुख पक्षांनी प्रचार, रणनीती आणि संघटनात्मक हालचाली अधिक वेगवान केल्या आहेत. आगामी काही दिवसांत या घडामोडींना अजून गती मिळण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.