Mumbai Metro 9: मुंबईकरांच्या आणि विशेषतः मिरा-भाईंदरकरांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते काशिगाव) या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिमाखात पार पडले. या नवीन मेट्रोमुळे आता मिरा-भाईंदर ते मुंबई हा प्रवास प्रचंड वेगवान, सुरक्षित आणि वातानुकूलित होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवासाचा वेळ 70 टक्क्यांनी घटला
ज्या प्रवासासाठी रस्ते वाहतुकीमुळे मुंबईकरांना दीड ते 2 तास खर्च करावे लागत होते, तोच प्रवास आता अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. दहिसर ते काशिगाव हे अंतर कापण्यासाठी जिथे 45 मिनिटे लागायची, तिथे आता मेट्रोने केवळ 10 ते 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. ही मेट्रो लाईन 7 ला जोडलेली असून, ती पुढे मेट्रो 3 (कुलाबा-सीप्झ) ला जोडली जाईल. यामुळे मिरा-भाईंदरकर थेट दक्षिण मुंबईतील कुलाबापर्यंत विनासायास प्रवास करू शकणार आहेत.
‘हरित प्रकल्प’ आणि इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना
मेट्रो 9 ही पूर्णपणे ‘हरित प्रकल्प’ म्हणून ओळखली जाणार आहे, कारण ती सौर ऊर्जा आणि LED लाइटिंगवर चालणार आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच पिलरवर उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे जागेची मोठी बचत झाली आहे. प्रशासनाने कॅशलेस प्रवासावर भर दिला असून, मेट्रोमध्ये 80 टक्के व्यवहार ‘वन कार्ड’ सुविधेद्वारे डिजिटल पद्धतीने होत आहेत.
संकल्प विकासाचा, गतिमान प्रवासाचा! ?Inauguration, flag-off and stone plaque unveiling of ‘Metro Line 9: Dahisar (East) to Kashigaon (Phase-1)’ at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Pratap… pic.twitter.com/ep6DNP3Sxz — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2026
मुंबईचे जाळे दिल्लीला मागे टाकणार?
उद्घाटनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईतील ऑपरेशनल मेट्रोचे जाळे आता 100 किमी पार गेले आहे. कोस्टल रोड आणि मेट्रो 9 मुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. पुढील 3-4 वर्षांत मुंबईचे मेट्रो नेटवर्क दिल्लीपेक्षाही मोठे करण्याचे आमचे स्वप्न आहे.” ही मेट्रो मार्गिका रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी मुंबईत जाणाऱ्या हजारो नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने ‘लाईफलाईन’ ठरणार आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे: वेळापत्रक आणि फेऱ्या
मेट्रो लाईन 7 आणि 9 आता संयुक्त कॉरिडॉर म्हणून गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव दरम्यान चालवल्या जातील. प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
एकूण लांबी: 19.79 किमी
पहिली गाडी: सकाळी 5:50 वाजता
शेवटची गाडी: रात्री 11:00 वाजता
वारंवारता (Frequency): गर्दीच्या वेळी दर 5 ते 6 मिनिटांनी, इतर वेळी 8 ते 10 मिनिटांनी.
दैनंदिन फेऱ्या: दररोज 276 फेऱ्या (शनिवारी 223 आणि रविवारी 205).