चेतन किर्दत, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सध्या नौकाविहाराचा थरारक अनुभव सुरू असून ‘सेल इंडिया 2025 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या आर्मी यॉटिंग नॉडतर्फे आयोजित या स्पर्धेत देशभरातून 120 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 26 जानेवारी 2025 पर्यंत मुंबईकरांना नौकानयनाच्या रोमांचक शर्यतींचा अनुभव घेता येणार आहे.
गिरगाव चौपाटीवर सुरू असलेल्या या स्पर्धेमुळे नौकानयनासाठी मुंबई हे प्रमुख केंद्र बनत आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी याच ठिकाणी सुरू झाली आहे. प्रशिक्षक संदीप जैन यांनी सांगितले की, गिरगावच्या समुद्रातील हवामान व वातावरण एशियन गेम्ससाठी उत्तम आहे. भारतीय संघ सध्या अधिक सक्षम युवा संघ तयार करण्यावर भर देत असून मराठमोळा प्रतिभावान सिद्धेश्वर डोईफोडे यांच्यासारखे खेळाडू सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्यासाठी निर्धाराने सराव करत आहेत.
‘सेल इंडिया 2025’ या स्पर्धेत 7 आंतरराष्ट्रीय श्रेणीतील खेळांचा समावेश असून, देशभरातील नामांकित खलाशी यात सहभागी झाले आहेत. वर्ल्ड सेलिंगच्या पात्र आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेमुळे नौकानयन क्रीडेला मोठे व्यासपीठ मिळत असून गिरगाव चौपाटीवर दरवर्षी हजारो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात.
मराठमोळ्या खेळाडूंचा निर्धार
गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने फक्त तीन पदके जिंकली होती, मात्र या वेळेस हे चित्र बदलण्याचा संकल्प प्रशिक्षक व खेळाडूंनी केला आहे. सिद्धेश्वर डोईफोडे यांनी सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला आहे.
गिरगाव चौपाटीवर सुरू असलेली ही स्पर्धा नौकानयन क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल ठरत आहे.