BMC Diwali Bonus : महाराष्ट्रातील तीन प्रमुख महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. शिंदे यांनी अधिकाऱ्यांनी बोनसची रक्कम तात्काळ वितरित करावी, असे निर्देश दिले आहेत.
या घोषणेनुसार, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक 34,500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये, तर ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी 24,500 रुपये बोनस देण्याचे निश्चित झाले आहे.
बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा
बीएमसीने (BMC) गुरुवारी (16 ऑक्टोबर) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये (अनुग्रह अनुदान/Ex-gratia Payment) जाहीर केले आहेत. हे 31 हजार रुपये पात्र बीएमसी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनुदानित खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहेत. यामध्ये शिक्षण सहायक आणि शिक्षण सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Mumbai BMC Homes Lottery 2025 : महापालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरी जाहीर; प्रथमच मुंबईत घरांसाठी काढणार सोडत
याशिवाय, शिक्षण सेवक आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थांमधील (अनुदानित आणि विनाअनुदानित) कर्मचाऱ्यांसह समुदाय आरोग्य स्वयंसेवकांना (CHV) 'भाऊबीज' भेट म्हणून 14,000 रुपये मिळतील. तसेच बालवाडी शिक्षिका आणि त्यांच्या सहाय्यकांना 5,000 रुपये दिले जातील, असे बीएमसीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
मागील वर्षीचा बोनस
गेल्या वर्षी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 28,000 रुपये बोनस जाहीर केला होता, तर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये बोनस देण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बीएमसीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, असे बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - Gunratan Sadavarte: एसटी बँकेच्या राड्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर, 'आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला...'