जळगाव: साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जळगावच्या बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. आज विजयादशमीच्या शुभ दिनी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
धार्मिक परंपरेनुसार, दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी केलेली खरेदी वर्षभर सुख-समृद्धी आणते, अशी मान्यता आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त साधण्यासाठी सकाळपासूनच जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. महिला, कुटुंबीय मोठ्या संख्येने दागिन्यांच्या दुकानात खरेदी करताना दिसत आहेत.
सोन्या-चांदीचे आजचे दर काय?
जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 20 हजार रुपये प्रति किलो इतका आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे दर ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहेत.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
गेल्या आठवडाभराच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि मागणी घटल्याने ही दर कपात झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना खरेदीची उत्तम आणि सुवर्णसंधी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांनीही दर कमी झाल्याने समाधान व्यक्त केले असून शुभ मुहूर्तावर खरेदी करत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर,
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.