देशभरात सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे. आता हा पवित्र उत्सव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदा महाअष्टमी आणि महानवमीचा योग एकाच दिवशी आल्यामुळे उपवास सोडण्याची नेमकी वेळ कोणती, याबाबत अनेक भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैदिक पंचांगानुसार, यंदा नवमी तिथी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:51 वाजता सुरू झाली असून, ती 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:50 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उपवासाचे पारण कधी करावे, याबद्दल धार्मिक ग्रंथांत आणि पंचांगात स्पष्ट नियम सांगण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या कुलपरंपरा आणि स्थानिक रीतिरिवाजांनुसार उपवास सोडण्याची वेळ भिन्न असू शकते, म्हणूनच घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम ठरते.
पारण कधी आणि कसे करावे?
धार्मिक मान्यतेनुसार, काही कुटुंबे नवमीच्या दिवशी हवन, पूजा आणि कन्यापूजन पूर्ण झाल्यानंतर उपवास सोडतात, तर अनेक घरांमध्ये विजयादशमीच्या दिवशी (दसऱ्याला) पारण करण्याची परंपरा पाळली जाते. पंचांगानुसार, 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:50 वाजेपर्यंत नवमी तिथी असल्यामुळे, या वेळेचा विचार करूनच पारण करणे योग्य ठरेल. उपवास सोडण्यापूर्वी देवी दुर्गेची षोडशोपचार पूजा, आरती आणि नैवेद्य दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, ज्यांच्या घरी हवन करण्याची प्रथा आहे, त्यांनी पूर्णाहुती दिल्यानंतरच भोजन ग्रहण करावे. उपवास सोडताना एकदम जड अन्न खाण्याऐवजी प्रथम पाणी, फळे किंवा हलका आणि सहज पचणारा सात्विक आहार घ्यावा, जेणेकरून आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
हेही वाचा – दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून का दिली जातात? जाणून घ्या, त्यामागची पौराणिक कथा
कन्यापूजनाचे महत्त्व आणि तिथीची सांगता
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची अत्यंत श्रद्धाभावाने आराधना केली जाते. महानवमीच्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी लहान मुलींचे पूजन करून त्यांना आदराने भोजन व भेटवस्तू दिल्या जातात. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्यामुळे अनेक ठिकाणी एकाच दिवशी कन्यापूजनाचे विधी पार पडले. नवरात्र ही केवळ उपवासाची नाही, तर मनातील दुर्गुणांवर आणि वाईट प्रवृत्तींवर संयमाचा विजय मिळवण्याची साधना मानली जाती. विजयादशमीच्या पवित्र दिवशी सर्व धार्मिक विधींची सांगता करून, आगामी काळासाठी नवीन सकारात्मक संकल्प सोडण्याची आपल्या संस्कृतीत मोठी परंपरा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.