नवरात्र उत्सवाचा सर्वत्र जल्लोष सुरू असून आज पाचवी माळ आहे. आज गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी दुर्गेच्या स्कंदमाता या स्वरूपाची पूजा केली जाते. स्कंदमाता ही ज्ञान आणि वात्सल्याची देवता मानली जाते.आजचा रंग पिवळा असून पिवळा रंग हा उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आज अनेक भाविक पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीच्या दर्शनाला आणि गरब्याला जाणार आहेत.
दरम्यान, नवरात्रोत्सवात गरब्याचा उत्साह शिगेला पोहोचला असताना एक चिंताजनक बाब समोर आली आहे. गरबा खेळताना चक्कर येणे, थकवा जाणवणे आणि डिहायड्रेशनच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यात सध्या असलेल्या दमट हवामानामुळे गरबा मंडपातच अनेकांना त्रास होत आहे.
1. रिकाम्या पोटी गरबा खेळणे – अनेक जण उपवासामुळे दिवसभर काहीच खात नाहीत आणि थेट गरबा खेळायला जातात. यामुळे शरीरातील साखर कमी होऊन चक्कर येते. गरब्याच्या 1 तास आधी केळं, खजूर किंवा फळं नक्की खा.
2. फक्त पाणी पिणे – घामाने फक्त पाणी नाही तर क्षारही शरीरातून बाहेर जाते. फक्त साधं पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन वाढतं. गरब्याआधी लिंबू-पाणी, नारळ पाणी किंवा ORS घ्या.
हेही वाचा – केस चिकट झाल्याने गरब्याचा मूड ऑफ होतोय?, घामापासून बचावासाठी वापरा 5 हेअर केअर टिप्स
3. घट्ट आणि सिंथेटिक कपडे – गच्च डिझायनर चणिया-चोलीत घाम अडकतो आणि उष्णता वाढते. सुती आणि हलके कपडे वापरा जेणेकरून हवा खेळती राहील.
4. सलग 2 तासांपेक्षा जास्त गरबा – जोशात 3 ते 4 तास सतत गरबा खेळल्याने शरीर थकतं. दर 40 मिनिटांनी 10 मिनिटांचा ब्रेक घ्या, पाणी प्या आणि मग पुन्हा खेळा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, चक्कर आल्यास तातडीने गरबा थांबवून गर्दीपासून लांब बसा आणि पाणी प्या. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकणार नाही. त्यामुळे गरबा खेळताना या आवश्यक बाबींची काळजी घ्या.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर