शारदीय नवरात्रीच्या उत्सवात प्रत्येक माळेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला माता दुर्गेच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची पूजा केली जाते. देवीचे हे स्वरूप तपस्या, संयम, श्रद्धा आणि दृढ निश्चयाचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी मनोभावे देवीची उपासना केल्याने भक्तांना मानसिक बळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे या माळेला देवीची पूजा करताना कोणती फुले अर्पण करावीत, कोणता नैवेद्य दाखवावा आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
माता ब्रह्मचारिणीला कोणती फुले अर्पण करावीत?
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला माता ब्रह्मचारिणीच्या पूजेमध्ये फुलांना विशेष स्थान आहे. धार्मिक परंपरेनुसार, देवीला जास्वंद आणि चमेलीची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पूजा करताना यापैकी उपलब्ध असलेले फूल देवीच्या चरणी अर्पण करू शकता.
देवीची आराधना करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असणे महत्त्वाचे मानले जाते. माता ब्रह्मचारिणी यांची उपासना केल्याने संयम, आत्मविश्वास आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कोण आहेत माता ब्रह्मचारिणी?
माता ब्रह्मचारिणी या दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांपैकी दुसरे स्वरूप आहेत. त्यांच्या एका हातात जपमाळ, तर दुसऱ्या हातात कमंडल असते. त्यांचे स्वरूप साधेपणा, तपश्चर्या आणि समर्पणाचा संदेश देते.
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे त्यांनी अत्यंत कठोर साधना केली. त्यांच्या या तपामुळे त्यांना ब्रह्मचारिणी आणि तपश्चारिणी अशी नावे प्राप्त झाली. कठोर तपश्चर्येमुळे त्यांना अपर्णा असेही संबोधले जाते.
माता ब्रह्मचारिणी यांचे स्वरूप भक्तांना एक महत्त्वाचा संदेश देते. आयुष्यात ध्येय गाठायचे असेल, तर संयम, सातत्य आणि मेहनत आवश्यक असते. अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नयेत, ही शिकवण त्यांच्या पूजेतून मिळते.
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचा शुभ मुहूर्त
पूजेसाठी शुभ वेळ जाणून घेणाऱ्या भाविकांसाठी पुढील मुहूर्त दिले आहेत.
माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी?
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर देवघर स्वच्छ करून पूजेची तयारी करावी. देवीला फुले, चंदन, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. तसेच पान, सुपारी आणि लवंग अर्पण करून साखर किंवा गुळापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
यानंतर माता ब्रह्मचारिणीची आरती करून मंत्रांचा जप करावा. शक्य असल्यास काही वेळ शांत बसून देवीचे स्मरण करावे.
नवरात्रीची दुसरी माळ ही श्रद्धा, साधना आणि आत्मविश्वास वाढवण्याची प्रेरणा देणारी मानली जाते. त्यामुळे या दिवशी माता ब्रह्मचारिणीची मनोभावे पूजा करून त्यांच्या गुणांचे आपल्या जीवनात आचरण करण्याचा संकल्प करू शकता.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.