Thursday, September 12, 2024 12:23:11 PM

मनसेकडून टोल नाक्यावर सीसीटीव्ही

मनसेकडून टोल नाक्यावर सीसीटीव्ही

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील मुख्य टोल नाक्यावर कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं असून येत्या दोन दिवसात मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर सीसीटीव्ही लावण्यात येतील असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. राज्य सरकार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारकडून आता टोल नाक्यांवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. त्याचसोबत मनसेही आपले वेगळे सीसीसीव्ही कॅमेरे लावणार आहे

मागील काही दिवसापासून मनसेकडून टोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्य टोल नाक्यावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुलुंड टोलनाक्याला भेट देत सीसीटीव्हीच्या संदर्भात पाहणी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

प्रत्येक टोलनाक्यावर २०० ते ३०० मीटरपर्यंत पिवळ्या रेषेवर रांग गेली, तर त्यापुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. ४ मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. त्याचप्रमाणे, "मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर उद्यापासूनच कॅमेरे लावले जातील. १५ दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाच्या कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवलं जाईल, किती गाड्या टोलवरुन जातात, हे कळण्यासाठी ही व्हिडीओग्राफी केली जाणार आहे."

मनसेच्या कॅमेऱ्यांचा टोलवर वॉच

राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच या सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.


सम्बन्धित सामग्री