छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, दि. २४ एप्रिल २०२४ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी बुधवारी (दि. २४ एप्रिल २०२४) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते गुरूवारी (दि. २५ एप्रिल २०२४ ) शेवटच्या दिवशी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अफसर खान यांची उमेदवारी वंचितने रद्द केली जात असल्याची अधिकृत घोषणाही वंचितच्यावतीने करण्यात आली नाही. नेतेही याबद्दल बोलायला तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वंचितने मुस्लीम उमेदवार दिल्याने नाराजी पसरली होती. अफसर खान यांनी मतदारसंघातून प्रचाराला सुरूवात केली होती . एमआयएमचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसींनी अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचा हा परिणाम आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. अकोला निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाही याचा फटका बसू नये म्हणून अफसर खान यांची उमेदवारी रद्द केली अशीही चर्चा आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे. त्यांना आतापर्यंत एबी फॉर्मसुध्दा देण्यात आला नाही.