बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टरमुळे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेण्यात आलेले नसून ‘पश्चिमेचा कटप्पा’ असा सांकेतिक उल्लेख करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये ‘ज्यांनी दादांच्या आधारावर मोठे होऊन त्याच दादांच्या फॅमिलीच्या पाठीत खंजीर खुपसला…’ अशा आशयाच्या मजकूरासह दिवंगत अजितदादांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नाराजांची भूमिका आणि विविध गटांच्या राजकीय हालचाली यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे.
विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात कारखान्याच्या निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, काही इच्छुकांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने सत्ताधारी गटासमोरील राजकीय आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील ‘पश्चिमेचा कटप्पा’ या पोस्टरने चर्चेत आणखी भर घातली आहे.
आगामी काळात या पोस्टरवरून कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा किती पुढे येतो, याकडे आता सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.पोस्टरमध्ये नावाचा थेट उल्लेख नसल्याने ‘पश्चिमेचा कटप्पा’ नेमका कोण? हा प्रश्न सध्या सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. तसेच यातून कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याबाबत सोमेश्वर परिसरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.