Garjana Morcha: मुंबईत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या ‘गर्जना मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला हा महामोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयाजवळ पोहोचला, जिथे मोर्चाचे रुपांतर भव्य सभेत झाले. या मोर्चात उद्धवसेना आणि मनसे व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने खांद्याला खांदा लावून चालताना दिसले.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भाषणांकडे लक्ष
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षांनी या मोर्चाद्वारे आपले शक्तिप्रदर्शन केले. पालिकेच्या मुख्यालयाबाहेर पार पडणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका मांडणार आणि कार्यकर्त्यांना काय दिशा देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळानंतर ठाकरे बंधू एकाच मुद्द्यावर एकत्र आल्याने विरोधकांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत असून, राजकीय वर्तुळात या मोर्चाची तीव्र चर्चा सुरू आहे.
आदित्य ठाकरेंची अचानक अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक मोर्चाची राज्यभरात जोरदार चर्चा होत असतानाच, दुसरीकडे उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली. निवडणूक आयोगाविरोधात सर्व विरोधी पक्ष आणि नेते आक्रमक झालेले असताना, या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनात आदित्य ठाकरे कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या गैरहजेरीचे अधिकृत कारण पक्षाकडून अथवा स्वतः आदित्य ठाकरे यांच्याकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.