बॉलिवूड अभिनेता व निर्माता आमिर खान याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी आमिर खानची पत्नी गौरी स्प्रॅटही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आमिरचा भाचा अभिनेता इम्रान खान याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याने या भेटीमागील कारणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
इम्रान खानच्या नोटीस प्रकरणाची चर्चा
अभिनेता इम्रान खान याला मुंबईतील परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रानला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर त्याने नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंच्या भेटीमागचे कारण काय?
इम्रान खानच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आमिर खानने राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमिर आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. तसेच, राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर आमिर खानने इम्रानच्या प्रकरणासंदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या भेटीचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या भेटीचा आणि इम्रान खानच्या प्रकरणाचा थेट संबंध आहे का, हे स्पष्ट होण्यासाठी अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.