‘हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा…’; अभिजित दीपकेंचं पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
‘हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा…’; अभिजित दीपकेंचं पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान
Abhijeet Dipke

महाराष्ट्रातील पोलीस दलाचे नाव जगभरात स्कॉटलंड यार्डप्रमाणे आदराने घेतले जाते, परंतु सध्या पोलिसांचा वापर करून आंदोलकांचे खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोप अभिजित दीपके यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “गृहमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी भूमिका वठवण्याचा प्रयत्न करू नये; हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे,” असा घणाघाती इशारा त्यांनी या वेळी दिला.

हेही वाचा – दिल्लीत विरोधकांचा अभूतपूर्व एल्गार; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षिय विरोधकांचा रस्त्यावर ठिय्या

“सहकाऱ्यांना छळण्यापेक्षा मला अटक करा;” पोलिसांच्या नोटिसांवरून थेट आव्हान

पत्रकार परिषदेत बोलताना दीपके यांनी पोलिसांच्या दडपशाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देण्यापेक्षा ताकद असेल तर पोलिसांनी मला स्वतःला थेट अटक करून दाखवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले. चंद्रपूर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पाठवलेल्या नोटिशीचा उल्लेख करत ते म्हणाले की, पोलीस आंदोलनाला हिंसक वळण लागेल असा संशय व्यक्त करत आहेत. जंतरमंतरचा दाखला देत पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून मोठा राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध

नंदुरबार येथे आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवताना दीपके म्हणाले की, राज्यात गुन्हेगारांवर कारवाई सोडून पोलीस हक्कासाठी लढणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवत आहेत. या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्वसामान्य आणि श्रीमंत वर्ग यांच्यातील पोलीस प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. यासोबतच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी मतदार याद्यांमधील सुमारे 13 कोटी मतांच्या कथित घोळावर भाष्य केले. राज्यभरातील तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये सरकारच्या या कारभाराविरोधात मोठा रोष निर्माण झाला असून, परिस्थिती न सुधारल्यास देशभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version