राहुल गांधींचा उल्लेख करत अभिजित दीपकेंचं मोठं विधान; काँग्रेसशी युती न करण्याचं कारण स्पष्टच सांगितलं..

सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
Abhijit Dipke
Abhijit Dipke

CJP Leader Abhijit Dipke Statement on Supporting Rahul Gandhi: निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. विरोधी पक्ष आणि सीजेपी हे एकमेकांविरोधात लढत असल्याचा चुकीचा नरेटिव्ह तयार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. वास्तवता अशी आहे की विरोधक आणि सीजेपी हे दोघेही स्वतंत्रपणे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातच लढा देत आहेत. सीजेपी ही कोणत्याही राजकीय पक्षाची बाहुली नसून तो एक पूर्णपणे स्वतंत्र दबाव गट (Pressure Group) म्हणून आपले कार्य सुरू ठेवेल, असे दीपके यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांशी युतीवर भाष्य
एका माध्यम संस्थेशी बोलताना अभिजित दीपके यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचा विशेष उल्लेख केला. जेव्हा राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेव्हा योग्य कारणासाठी सीजेपीने त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला होता, असे त्यांनी आठवण करून दिली. मात्र, जर सीजेपी प्रत्यक्ष कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संलग्न झाली, तर संघटनेसोबत असलेल्या 2.5 कोटी तरुणांच्या विश्वासाचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्याशी जोडलेला तरुण वर्ग हा स्वतंत्र विचारांचा असून कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचा शिक्का स्वतःवर मारून घेण्यास त्यांचा स्पष्ट विरोध आहे.

हेही वाचा – ‘CJP अन् आमचा अजेंडा वेगळा…’; ‘या’ बड्या नेत्याचा अचानक यु-टर्न; अभिजीत दीपकेंना मोठा झटका

‘उद्या काँग्रेस-आपचे सरकार आले आणि चुका झाल्या, तर जनतेला उत्तर काय देणार?’
भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल बोलताना दीपके म्हणाले की, आज जर आम्ही काँग्रेस, आम आदमी पार्टी किंवा शिवसेनेसोबत थेट उभे राहिलो आणि उद्या देशात या पक्षांची सत्ता आली, तर आमचे समर्थकच आम्हाला जाब विचारतील. उद्या सत्तेत आल्यानंतर जर या पक्षांनी काही चुकीचे निर्णय घेतले किंवा काम केले, तर आम्हाला थेट जनतेला उत्तर द्यावे लागेल. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाची सावली स्वतःवर पडू न देता तटस्थ राहून जनतेचे आणि तरुणांचे प्रश्न मांडणे हीच सीजेपीची मुख्य भूमिका असणार आहे.

कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर रणनीती बदलण्याचे संकेत; लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
संघटनेतील सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेसह त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या कारवाईवर अभिजित दीपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार आणि प्रशासनाकडून आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशा दबावाला बळी न पडता सीजेपी आता आपली आक्रमक रणनीती बदलेल आणि कायदेशीर चौकटीत राहून आंदोलन अधिक तीव्र करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – दिल्लीत CJP आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता CAPF च्या 273 कंपन्या…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version