ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी 29 सप्टेंबरला रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांना लागलेल्या चार गोळ्यांपैकी एक गोळी मानेतून आरपार गेल्या असून दुसरी गोळी त्यांच्या छातीतच अडकून राहिली होती.
यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने इन्फीनीटी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेत ठार झालेले शिवसेना उबाठाचे प्रदीप पूर्णेकर यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून ठाण्यातील त्यांच्या घराकडे आणण्यात आले आहे. यावेळी रुग्णवाहिका ठाण्यात येताच, कापूरबावडी पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांची मोठी गर्द झाली आहे. याचपार्श्वभूमीवर ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल झाले आहेत.
यावेळी ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात पोहोचले असून पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधणार असून घडलेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेतील. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोपी पप्या शिंदेला अटक करण्यात आली असून संतोष कनोजिया, निखिल यादव, नितेश पवार उर्फ भावड्या आणि आकाश निमसे हे फरार आहेत.
या हत्येमागे राजकीय संघर्ष असून शिंदे सेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणारे सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे. या सगळ्या घटनेमुळे सध्या ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि संपूर्ण घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.