बारामती: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबातील हालचाली वाढल्या असून कुटुंबातील सदस्य वारंवार एकमेकांच्या भेटी घेत असल्याचे चित्र आहे.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काल बारामती येथे पार्थ पवार आणि जय पवार यांची महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये पार पडली. विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टवर जय पवार किंवा पार्थ पवार यांची वर्णी लागणार का, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. याचबरोबर राज्याच्या राजकारणातील काही महत्त्वाच्या घडामोडींवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, आज पुन्हा जय पवार यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला रोहित पवार, राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर आज जय पवार किंवा पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या स्मारकाबाबतचा निर्णय एकत्रित बैठकीत घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आज विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातील अजित पवार यांच्या स्मारकाबाबत अंतिम आणि महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार यांना राजकारणातील ‘चाणक्य’ मानले जाते. या पार्श्वभूमीवर या बैठकीत विद्या प्रतिष्ठानच्या भवितव्याबाबत तसेच राज्याच्या राजकारणासंदर्भात जय आणि पार्थ पवार यांना मार्गदर्शन करण्यात आले, असेही सांगितले जात आहे.