प्रतिनिधी, सुरेंद्र आकोडे: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उद्रेक पाहायला मिळत असून, तब्बल 8 नेत्यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. यामध्ये एकट्या भाजपचे 4 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या किरण सरनाईक यांच्या अडचणीत यामुळे मोठी वाढ झाली असून, या बंडखोरांची समजूत कशी काढायची असा बिकट प्रश्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभा राहिला आहे.
भाजप, राष्ट्रवादी, प्रहार आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार आमनेसामने
शिक्षक मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेनेचे किरण सरनाईक हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांमधून बंडखोरीची लांबच लांब यादी तयार झाली आहे. भाजपमधून संगीता शिंदे, महंत सुनील महाराज, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार या 4 नेत्यांनी पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही बंडखोरी केली आहे. दिलीप कडू हे वीमाशीचे अधिकृत उमेदवार आहेत (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ) यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते विधान परिषद आमदार संजय खोडके तथा अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचं समर्थन आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नितीन आगे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवणे यांनीही आपापले अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
हेही वाचा – सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोड; खासदार उदयनराजे भोसले यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनींची बंडखोरी
या बंडखोरीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणजे भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे या भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही असा ठाम निश्चय व्यक्त करत त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मित्रपक्षांच्या आणि स्वपक्षीय बंडखोरांची एवढी मोठी फौज उभी राहण्याची ही बहुधा पहिलीच वेळ मानली जात आहे.
विरोधकांची भूमिका आणि निवडणुकीतील रंगत
ही बंडखोरी केवळ महायुतीपुरतीच मर्यादित राहिलेली नसून, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही या निवडणुकीत आपापले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे यंदाची अमरावती शिक्षक मतदारसंघाची लढत बहुकोणीय आणि अत्यंत रंजक बनली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांना या 8 बंडखोरांच्या आव्हानाला सामोरे जात मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी माघारीच्या दिवशी किती बंडखोर आपले अर्ज मागे घेतात आणि प्रत्यक्ष किती जण रिंगणात राहतात, यावरच या निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून असणार आहे.