तामिळनाडूतील मातब्बर नेते आणि माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई यांनी कॉकरोच जनता पार्टीला (CJP) पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून अचानक माघार घेतली आहे. सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्नामलाई यांनी स्पष्ट केले की, त्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कधीही कॉकरोच जनता पार्टीचे समर्थन केलेले नाही. आमची राजकीय विचारधारा आणि सीजेपीचा अजेंडा पूर्णपणे भिन्न असल्याने त्यांच्याशी कोणताही संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या काही दिवसांपूर्वी सीजेपीच्या मागण्यांचे समर्थन करणाऱ्या अन्नामलाई यांनी घेतलेल्या या यु-टर्नमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी दिला होता सीजेपीच्या मागण्यांना पाठिंबा
काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात अन्नामलाई यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या पद्धतीशी असहमती दर्शवली असली, तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समर्थन केले होते. सीजेपी नेत्यांवरील अटकेच्या कारवाईमुळे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी नमूद केले होते की, सत्ताधारी पक्ष स्वतःचे महत्त्व टिकवण्यासाठी सतत नवीन विरोधक तयार करत आहे. सीजेपीचे आंदोलन परदेशी निधीतून चालत असल्याचा किंवा ते देशविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी त्यावेळी फेटाळून लावला होता. मात्र, आता त्यांनी या संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदेंचे मंत्री अन् आमदार जरांगेंचे पाय का दाबत होते?’; लक्ष्मण हाके यांचा संतप्त सवाल
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वतंत्र पक्षाची तयारी
तामिळनाडू भाजपचे अध्यक्षपद भूषवलेल्या अन्नामलाई यांनी जून महिन्यात पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रीय पक्षाच्या चौकटीमुळे प्रादेशिक राजकारणात मर्यादा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून, सध्या ते स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, त्यांच्या या बदलत्या भूमिकेवर तामिळनाडू भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजपमध्ये असताना ज्या धोरणांचे अन्नामलाई यांनी समर्थन केले होते, पक्षातून बाहेर पडताच त्यांनी तीच भूमिका कशी बदलली, असा सवाल भाजप प्रवक्त्यांनी उपस्थित केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.