आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात घडलेल्या एका घटनेवरून राजकीय वादंग पेटला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान याच्या अर्धशतकानंतरच्या हावभावाचा उल्लेख करत केंद्र सरकार, बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
राऊत यांनी ‘एक्स’वर लिहिले की फरहानने बॅट रायफलसारखी धरून केलेल्या हालचालीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाव हल्ल्याची आठवण जागवली. एप्रिलमध्ये झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा प्रकार भारतीय जनतेच्या भावना दुखावणारा असून, सरकार आणि बीसीसीआयचे मौन लाजिरवाणे असल्याचे राऊतांनी म्हटले.
जय शाह यांच्यावरही त्यांनी उपरोधिक निशाणा साधला. “अशा प्रकारच्या घटनेसाठी जय शाह यांना भारतरत्न द्यायला पाहिजे,” अशी टिप्पणी राऊतांनी केली. यामुळे भारत-पाक क्रिकेट सामन्याबरोबरच राजकीय चर्चेलाही चांगलाच ऊत आला आहे.
दरम्यान, सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. 172 धावांचे आव्हान स्वीकारताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार सुरुवात केली. त्यानंतर तिलक वर्माने ठोस फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व फॉरमॅट्समध्ये सातव्यांदा सलग यश मिळवले.