बंडखोरी भोवली! अमरावतीत भाजपचा मोठा निर्णय; तीन उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपने चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार आणि नितीन गुडधे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले.

बंडखोरी भोवली! अमरावतीत भाजपचा मोठा निर्णय; तीन उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी
Amravati Teacher Constituency

सुरेंद्र आकोडे, अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात कायम राहिलेल्या तीन बंडखोर उमेदवारांसह भाजप पदाधिकारी नितीन गुडधे यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तीन बंडखोर उमेदवारांवर कारवाई

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला देण्यात आली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक निवडणूक लढवत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याच्या भूमिकेमुळे भाजपने या तिन्ही उमेदवारांविरोधात कारवाई केली. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.

हेही वाचा: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! तुकाराम मुंढेंच्या देखरेखीखाली चौकशी; शिवेंद्रराजेंनी आंदोलकांना दिला सरकारचा मसुदा

नितीन गुडधे यांच्यावरही कारवाई

या प्रकरणात भाजपचे पदाधिकारी नितीन गुडधे यांच्यावरही पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आणि बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांना सहकार्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व संपुष्टात आणत सहा वर्षांसाठी निष्कासित करण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कठोर पवित्रा

महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांवर कारवाई करून भाजपने पक्षशिस्तीबाबत कठोर भूमिका घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याचेही या कारवाईतून दिसून येते. आता या कारवाईचा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारांना किती पाठिंबा मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number