Pune Election 2026: कुछ कह गए, कुछ सह गए…" मेधा कुलकर्णींच्या पोस्टमागे दडलंय काय? पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून, मेधा कुलकर्णी यांच्या सूचक पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Pune Election 2026: कुछ कह गए, कुछ सह गए…&quot मेधा कुलकर्णींच्या पोस्टमागे दडलंय काय? पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षामध्ये उभ्या फुटीचे आणि तीव्र असंतोषाचे चित्र समोर आले आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिकसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ असा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या गोटात संतापाचा उद्रेक झाला असून, आता भाजपच्याच खासदार मेधा कुलकर्णी यांनी या वादात सहभाग घेत स्वपक्षाला आरसा दाखवला आहे.

या सर्व गदारोळात पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची सोशल मीडिया पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून देत, “कुछ कह गए, कुछ सह गए… कुछ कहते कहते रह गए” असा शेर पोस्ट केला आहे. निष्ठावंतांच्या बलिदानाकडे आणि कष्टाकडे दुर्लक्ष करणे पक्षाला आगामी काळात महागात पडू शकते, असा सूचक इशाराच त्यांनी वरिष्ठांना दिला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे भाजपमधील अंतर्गत खदखद आता केवळ कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नसून, ती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Raj – Uddhav Thackeray: राजकारण तापणार जेव्हा ठाकरे बंधू मैदानात उतरणार! 5 तारखेपासून सभांचा धडाका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भाजपने या निवडणुकीत अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून धक्कातंत्राचा अवलंब केला. “नेत्यांच्या घरात उमेदवारी देणार नाही” असे जाहीर आश्वासन दिले असतानाही, प्रत्यक्षात मात्र काही नेत्यांच्या कुटुंबात चक्क तीन-तीन उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. “बाहेरून आलेल्यांना लाल गालिचा आणि रक्ताचे पाणी करणाऱ्यांना घाट,” अशी भावना निष्ठावंतांमध्ये निर्माण झाली आहे. धुळे, अकोला आणि नाशिकमध्येही पक्षांतर्गत धुसफूस थांबवण्यात नेत्यांना अपयश आले आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज भरले आहेत. यामुळे भाजपची मते फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जरी नेत्यांनी बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी शमवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात मेधा कुलकर्णी यांची भूमिका ही केवळ एका व्यक्तीची नाराजी नसून, तो भाजपमधील ‘खऱ्या’ कार्यकर्त्यांचा आवाज असल्याचे मानले जात आहे.

उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपचे संकटमोचक या नाराजीचा वणवा विझवण्यात यशस्वी होतात की नाही, यावरच अनेक महापालिकांमधील विजयाचे गणित अवलंबून असेल. मेधा कुलकर्णी यांच्या ‘घरच्या आहेरा’मुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, प्रचाराच्या मैदानात भाजपला आता अंतर्गत वादाचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: Mumbai Expressway: मुंबईला मिळणार नवा द्रुतगती मार्ग; वाहतूक कोंडीवर मोठा तोडगा ठरणार बडोदा-मुंबई एक्सप्रेसवे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number