ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेली एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला अशा चर्चांना उधाण आले आहे. एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांच्यावर शिंदेसेनेतून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युनूस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे युनूस शेख यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
यादरम्यान युनूस शेख यांनी आपण शिंदे सेनेत गेल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच हे पद केवळ त्यांच्या व्यवसायाकरिता मिळालेले असून आपण एमआयएम मध्येच असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या पक्षप्रवेशावर भाजप नेते नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केल्याने महायुतीमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा- मुंब्रा हिरवा करण्याचा इशारा देणाऱ्या सहर शेखच्या वडिलांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा
यावेळी नितेश राणे म्हणाले की, “हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारे हे सगळे जिहादी आहेत. त्यामुळे त्यांना आपण कुणीही बळ देऊ नये, या भूमिकेचे आहोत. सापाला दूध पाजत नाही. हे कुठेही असले तरी यांच्या डोक्यातून जिहाद जाणार नाही. त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला काय शिकवण दिली, हे उभ्या महाराष्ट्राने बघितली आहे. त्यामुळे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा शिवसेना पक्षाने, एकनाथ शिंदे याबाबत विचार करतील, त्या घाणीला आपल्या पक्षातून बाहेर काढतील.”
तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के म्हणाले की, “मला काही कल्पना नाही, केबल सेनेचे अध्यक्ष केले असतील तर माहिती घेतो. संघटनात्मक काम पाहणाऱ्यांशी चर्चा करून मग प्रतिक्रिया देईन. शिंदे साहेबांना सर्व जाती-धर्माचे लोक मानतात, प्रेमाखातर कोणी वक्तव्य केली असतील तर माहिती घेतो. हे प्रकरणच माहित नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया काय देऊ?” त्यामुळे आता युनूस शेख यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेकडून पक्षविस्तारासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत असताना, दुसरीकडे भाजप नेत्यांकडून व्यक्त होणारी नाराजी महायुतीतील अंतर्गत मतभेदांना हवा देऊ शकते. युनूस शेख यांच्या पक्षप्रवेशावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार का, तसेच या प्रकरणावर वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.