मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. सत्तेच्या सारीपटावर शह-काटशहाचा खेळ रंगत असतानाच, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते भारतीय जनता पक्षाने. 'नव्या रक्ताला वाव आणि निष्ठावंतांना न्याय' हे सूत्र अंगीकारत भाजपने विधान परिषदेच्या संभाव्य 5 जागांसाठी तब्बल 30 नावांची जम्बो यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे मंजुरीसाठी धाडली आहे. त्यामुळे उमेदवारीचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या निर्णयाकडे लागले आहेत.
उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज्य भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांचा धडाका सध्या सुरू आहे. उमेदवारी देताना प्रामुख्याने संघटनात्मक पातळीवर झोकून देऊन काम करणाऱ्या आणि नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकांमध्ये घेण्यात आला आहे.
उमेदवारांचे निकष ठरवण्यासाठी काल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर सविस्तर खलबते झाली. त्यानंतर आज सकाळीही विभागवार चर्चा पार पडली. आता या सर्व मंथनातून तावून सुलाखून निघालेल्या नावांवर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी कोअर कमिटीची पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
हेही वाचा: Donald Trump Orders to Navy: 'तर दिसताच गोळ्या घाला...', डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश, इराणबरोबर युद्ध पेटणार; आखाती भागात वाढली चिंता
विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी ही रणधुमाळी उडणार असून, राजकीय गणितांनुसार यापैकी 5 जागा भाजपच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने एका जागेमागे 6 याप्रमाणे 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला सोपवली आहे. विशेष म्हणजे, प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी पुन्हा प्रज्ञा सातव यांच्याच नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या एका जागेचा तिढा सुटल्यात जमा असून, खरी चुरस उर्वरित जागांसाठी रंगणार आहे.
दिल्लीला पाठवण्यात आलेल्या या यादीतील काही नावे आता समोर आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य उमेदवारांच्या यादीत संदीप जोशी, जगदिश मुळीक, माधवी नाईक, राम सातपुते, मनोज कोटक, अर्चना पाटील चाकूरकर, केशव उपाध्ये, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रवी अनासपुरे, राजेश पांडे, संजय भेंडे, दादाराव केचे, संजय केणेकर, प्रमोद जठार, दयाशंकर तिवारी आणि रणजितसिंह निंबाळकर अशा राज्यभरातील विविध नेत्यांचा समावेश आहे. यातील अनेक नेत्यांनी पक्षासाठी सातत्याने मोठे काम केले असून, त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकंदरीतच, विधान परिषदेच्या या निवडणुकीत 'कामाला प्राधान्य' हा स्पष्ट संदेश भाजपच्या राज्य नेतृत्वाला द्यायचा असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीचे हायकमांड या 30 नावांच्या यादीतून नेमक्या कोणत्या 5 शिलेदारांच्या गळ्यात विधान परिषदेची माळ टाकणार, याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे. येत्या काही दिवसांतच दिल्लीतून अधिकृत नावे जाहीर होतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची नांदी होईल, यात शंका नाही.
हेही वाचा: MI Vs CSK IPL 2026: मुंबई इंडियन्सचा 'होम ग्राउंड'वरच मोठा पराभव, चेन्नईने 103 धावांनी लोळवलं