पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमधील मित्रपक्षांतील दरी आता चव्हाट्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत खोचक शब्दांत त्यांना प्रत्युत्तर दिले. "अजित पवारांना सत्तेत घेताना थोडा विचार करा, असा सल्ला मी फडणवीस साहेबांना आधीच दिला होता," असा खळबळजनक गौप्यस्फोट करत चव्हाणांनी पुण्याच्या राजकीय मैदानात खळबळ उडवून दिली आहे.
अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेताना रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच निशाणा साधला. "सभेत काय बोलायचे आणि कोणावर काय आरोप करायचे, यासाठी हल्ली भाड्याने एजन्सी घेतल्या जातात. इतकेच काय, कोणता 'शर्ट' लकी आहे, इथपासून ते स्वतःला लोकप्रिय दाखवण्यापर्यंत सर्वकाही कंपन्यांच्या मदतीने केले जाते," असा टोला चव्हाणांनी लगावला. जमिनीवर राहून काम करण्याऐवजी सोशल मीडिया आणि भाड्याच्या स्क्रिप्टवर राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी पवारांना सुनावले.
पुण्यातील सभेमध्ये अजित पवारांनी भाजपच्या 'कारभारी त्रिकुटा'वर तोफ डागली होती. पालिकेतील ठेवी मोडून भ्रष्टाचार केल्याचा आणि केंद्रात-राज्यात सत्ता असूनही पुण्याचे प्रश्न न सोडवल्याचा आरोप पवारांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना चव्हाणांनी भाजपची बाजू सावरून धरली. पुणे महापालिकेतील कामांचे श्रेय नाकारणाऱ्यांनी आधी आपल्या कार्यकाळातील पारदर्शकतेचे उत्तर द्यावे, असा पवित्रा भाजपने घेतला आहे.
रवींद्र चव्हाणांनी यावेळी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, "जेव्हा अजित पवारांना सत्तेत घेण्याचा निर्णय होत होता, तेव्हा मी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध केले होते. आपली विचारधारा 'ना खाऊंगा, ना खाने दूँगा' अशी पारदर्शक आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेताना विचार करा, असे मी साहेबांना सांगितले होते, पण माझे ऐकले नाही." चव्हाणांच्या या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात अजितदादांबाबत नेमकी काय भावना आहे, हे स्पष्ट झाले आहे.
केवळ विरोधकांवरच नाही, तर चव्हाणांनी आपल्या पक्षातील नेत्यांनाही घरचा आहेर दिला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची कानउघाडणी करताना ते म्हणाले की, "निवडून येण्यासाठी 'शायनिंग' मारू नका किंवा 'सेटिंग' करू नका. केंद्र आणि राज्यात आपली सत्ता आहे, आता पालिकेतही एकाच विचारांची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा." कार्यकर्त्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुण्याच्या सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखे वागत आहेत. एका बाजूला 70 हजार कोटींच्या आरोपांची ढाल आणि दुसऱ्या बाजूला 'पारदर्शक कारभाराचा' दावा, यामुळे पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तेत एकत्र असूनही निवडणुकीच्या रिंगणात हे दोन पक्ष आमनेसामने आल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: BMC Election : रामदास कदमांचा घणाघात, अमित-आदित्य ठाकरेंचा पिल्लं म्हणून उल्लेख