मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा नवा प्रयोग भाजप करणार आहे. तो अमलात कसा आणायचा यासाठी गेल्या चार दिवसांत संपूर्ण राज्यासाठी एक आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा बैठका केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भाजप विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतल्या. राज्यातील १६० विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार कोण असावेत? यासाठी प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना एकेक लिफाफा देण्यात आला असून त्यात तेथील संभाव्य उमेदवाराची नावे सीलबंद केली जाणार आहेत.