मुंबई: नुकताच, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 'दोन भावांनी बोलले पाहिजे, आम्ही बोलून काहीही फायदा नाही', अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीच्या प्रश्नावर अमित ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले अमित ठाकरे?
'मला असं वाटतं त्या दोन भावांनी एकमेकांशी बोलले पाहिजे, फक्त आम्ही बोलून काहीच उपयोग नाही. मला काही हरकत नाही जर दोन भाऊ एकत्र आले तर, पण मी 2014आणि 2017 पाहिले आहे. 2014 ते 2017 सोडा, मी कोव्हिड काळात पाहिले आहे जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भयानक आजार आपल्यावर आला आहे. सरकार कोणतेही असो, आपण त्यांची साथ दिली पाहिजे', अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.
पुढे मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की, 'बऱ्याचदा मी त्यांचे फोन कॉल्स बघितले आहेत. मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. मला असं वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. ते बोलू शकतात. शेवटी ते दोन भाऊ आहेत. बोलतील ना ते एकत्र'.
जुने वाद विसरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होत असून दोन्ही बाजूंकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. 'महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास आम्ही तयार आहोत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्याचप्रमाणे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आपले मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी करत आहेत.
हेही वाचा: 'सुपेकर-अमिताभ गुप्तांनी मिळून ...';सुपेकरांवर राजू शेट्टींचे गंभीर आरोप
मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले 'एक्स'वर संकेत:
गुरुवारी सकाळी, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 'एक्स'वर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी 'लपवण्यासारखे काही नाही...', असे कॅप्शन देत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे संकेत दिले.