Saturday, March 07, 2026 08:26:58 AM

Zilla Parishad Election 2026: लोकशाहीची थट्टा? कुठे आमदारानं लहान मुलाकडून दाबून घेतले EVM चे बटण, तर कुठे पालकांसोबत मुलगा मतदान केंद्रात

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाकडून ईव्हीएमचे बटण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.

zilla parishad election 2026 लोकशाहीची थट्टा कुठे आमदारानं लहान मुलाकडून दाबून घेतले evm चे बटण तर कुठे पालकांसोबत मुलगा मतदान केंद्रात

छत्रपती संभाजीनगर: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू असताना एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. पाचोड येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश करून नव्या वादाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, भुमरे यांनी मुलाला केवळ मतदान यंत्राजवळ नेले नाही, तर तेथील कर्मचाऱ्याकडून मुलाच्या बोटाला शाईदेखील लावून घेतली. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले असून केंद्राध्यक्षांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, "हा प्रकार अतिशय गंभीर आहे. मतदान केंद्रातील गोपनीयतेचा आणि नियमांचा भंग झाला आहे. या घटनेची पूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल."

संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया

या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार संदिपान भुमरे यांनी म्हटले की, “लहान मुलांना मतदान केंद्रावर नेण्यास परवानगी असते. मात्र, नेमके काय घडले याची मला माहिती नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच यावर अधिकृत प्रतिक्रिया देईन.”

हेही वाचा: PM Kisan 22nd Installment : खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याचे पैसे येणार; यादीत नाव 'असं' चेक करा

तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथेदेखील असात प्रकार घडलेला पाहायला मिळाला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आपल्या मुलाला घेऊन मतदार केंद्रावर दाखल झाले. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपल्या रुद्रराज मोहिते पाटील या लहान मुलाला घेऊन आले. मतदान केंद्राध्यक्षांकडून लहान मुलांना मतदान केंद्रात घेतल्याचा आक्षेप याठिकाणी नोंदवण्यात आला. आईला आणि वडिलांना मतदान करताना बघायचे म्हणून मुलाला आणले असल्याचं अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचं अजब स्पष्टीकरण समोर आलं आहे.  

राज्यात मतदान प्रक्रिया सुरू

दरम्यान, राज्यातील 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या असून, काही भागांत कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. तथापि, बहुतांश जिल्ह्यांत मतदान शांततेत पार पडत आहे.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान

मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवसभरातील एकूण मतदानाची टक्केवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार असून,9 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर ग्रामीण सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. 

हेही वाचा: Eknath Khadse : आताची मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; प्रकरण काय?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या