PMC Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय नाट्याचा परमोच्च बिंदू पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीच्या गुंतागुंतीत अनेक नेत्यांची धाकधूक वाढलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानकर यांची दोन मुले दोन वेगवेगळ्या पक्षांतून आणि चिन्हांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत.
हर्षवर्धन राष्ट्रवादीकडून, तर राघवेंद्र भाजपकडून उमेदवारी
पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मानकर कुटुंबात यंदा वैचारिक आणि पक्षीय विभागणी पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष असलेले हर्षवर्धन हे प्रभाग क्रमांक 11 मधून 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तथापी, भाजपचे शहर सरचिटणीस असलेले राघवेंद्र मानकर यांना पक्षाने प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी दिली आहे. त्यांनी 'कमळ' चिन्हावर आपला अर्ज दाखल केला आहे.
मानकरांच्या लेकाची प्रतिक्रिया
आपल्या उमेदवारीवर बोलताना राघवेंद्र मानकर यांनी भाजपमधील आपल्या सक्रिय कार्याचा उल्लेख केला. "गेल्या नऊ वर्षांपासून मी भाजप संघटनेत पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून जमिनीवर काम करत आहे. माझ्या कष्टाचा विचार करूनच पक्षाने मला ही संधी दिली आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकीय सत्तेसाठी घरातीलच 'मैत्रीपूर्ण' लढत?
राज्यात महायुतीत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे महापालिकेत मात्र अनेक ठिकाणी आमनेसामने उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत दीपक मानकर यांच्या एका मुलाला राष्ट्रवादीने आणि दुसऱ्याला भाजपने तिकीट दिल्याने पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.