Saturday, July 12, 2025 12:33:03 AM

Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक महापूजा; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.

ashadhi wari 2025 आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक महापूजा राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

पंढरपूर: आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हरिनामात दुमदुमून गेला आहे. पंढरपूर नगरीत लाखो भाविकांनी एकत्र येत विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी श्रद्धा अर्पण केली. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली उपस्थिती नोंदवत विठोबाच्या चरणी सपत्नीक महापूजा केली. त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस व मुलगी दिविजा देखील होत्या.

पहाटेच्या पूजेनं घेतलं विठोबाचं आशीर्वाद

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पहाटे 3 वाजता विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने महापूजा केली. दर्शनानंतर त्यांनी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला आणि धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या सोबत नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यही होते.

मंदिर समितीकडून मुख्यमंत्री दांपत्याचा सत्कार

महापूजनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांनी “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” च्या गजरात आनंद व्यक्त केला.

हेही वाचा:Pandharpur Wari 2025: वारीला जाता आलं नाही? हरकत नाही, विठोबा येईल तुमच्या घरी; जाणून घ्या कसं

राज्याच्या प्रगतीसाठी विठोबाच्या चरणी साकडं

महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, 'आजच्या दिवशी विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. मी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विठोबाच्या चरणी प्रार्थना केली आहे.'

संपूर्ण पंढरपूर हरिनामात दुमदुमलं

पंढरपूर नगरीत सध्या विठोबा माऊलीच्या नामस्मरणाचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. लाखो वारकरी टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात विठोबाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती यावर्षीच्या आषाढी उत्सवात एक विशेष आकर्षण ठरली.

हेही वाचा:Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती

पंढरपूरमध्ये पार पडलेल्या या पूजेनं केवळ धार्मिक महत्त्वच नव्हे, तर राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचंही प्रतीक म्हणून ठसा उमटवला आहे. विठोबाच्या कृपेने महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि शांततेचा वर्षाव होवो.


सम्बन्धित सामग्री